लिंगाणा

सह्याद्री…महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान. सह्याद्रीच्या साहाय्याने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असंख्य गडकोट आजही ताठमानेने उभे आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण असा लिंगाणा…

लिंगा सारखा आकार असल्यामुळे त्याला लिंगाणा असे संबोधले जाते. युरोप खंडातील मॅटर हॉर्न हे जेवढेे अवघड शिखर आहे, त्याचप्रकारे सह्याद्रीतील लिंगाणा हादेखील अवघड असा किल्ला आहे. त्यामुळे लिंगाण्याला सह्याद्रीतील मॅटर हॉर्न असेही म्हटले जाते. कोकण आणि घाटमाथा यांच्या मधोमध असणारा लिंगाणा खरोखरच एक आव्हानात्मक असा किल्ला आहे. रायगड हे हिंदवी स्वराज्याचे राजगृह, तर लिंगाणा हे कारागृह. जो कोणी राजद्रोह करेल, त्याला लिंगाण्यावर कैदेत ठेवले जात असे. गुहेत ठेवल्यानंतर दोर आणि शिड्या काढून घेतल्या की त्या गुन्हेगारांनी सहीसलामत बाहेर पडण्याचा प्रयत्न करणेे म्हणजे थेट मृत्यूशीच गाठ. 950 मीटर उंच असणारा हा लिंगाणा सुळका म्हणजे गुन्हेगारांना कर्दनकाळ ठरणारा असा हा किल्ला.

कसे जाल? :

पुण्याहून कोल्हापूरला जाताना खेडशिवापूर सोडल्यानंतर उजव्या बाजूस नसरापूर गांव आहे. या गावातून वेल्हा-वरुतीमार्गे मोहरी गावात जावे. मोहरी गावापर्यंत चारचाकी गाडी जाते. तेथे गाडी लावून बोराट्याच्या नाळेतून मार्गक्रमण करत आपण लिंगाण्याकडे जाऊ शकतो. वाट अत्यंत बिकट आणि अवघड असल्याने सुरक्षित जावे लागते. कोकणातून महाडमार्गे रायगड किल्ल्याच्या पिछाडीस असणार्‍या दापोली व पाणे गावातूनही लिंगाण्याला जाते येते. लिंगाण्याच्या पायथ्याशी असणार्‍या पाणे येथून लिंगाण्याचा गगनभेदी सुळका फार देखणा दिसतो.

काय पहाल ? :

लिंगाणा केवळ 250 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा किल्ला आहे. लिंगाणा माचीतून गडमाथ्याकडे जाताना वाटेत पहार्‍याची चौकी तसेच ढासळलेल्या पायर्‍या दिसतात. अडचणींचा सामना करत आपण पोहचतो ते गुहेच्या ठिकाणी. याला सदर असेही म्हटले जाते. या गुहेला चार खिडक्या आणि प्रवेशद्वार आहे. शेजारी धान्यकोठार आहे, तसेच पाण्याचे हौद व काही भग्नावशेषही येथे दिसतात. गडावर पूर्वी सोमजाई व जननी देवीचे पूजन होत असे. सध्या त्या मूर्त्या तेथून लिंगाणा माचीतच स्थानापन्न केल्या आहेत. लिंगाण्यावरुन रायगडावरील राजसभेचे महाद्वार आणि जगदीश्‍वर मंदिराचा कळसही दिसतो. पूर्वेकडे राजगड आणि तोरणाही नजरेच्या टप्प्यात दिसतो.

इतिहास:

शिवकालापासून राजद्रोह करणार्‍यांना लिंगाण्यावर कैदेत ठेवले जात असे. 1775 ते 76 मध्ये गोपाळशेट सोनार, 1783 मध्ये मानसिंग खलाटे, 1789 ला गणेशभट परांजपे (मोरोबा दादांच्या पक्षातील), 1785 मध्ये मोरोजी नाईक-संकपाळ, 1795 मध्ये मेस्तर जमा फरसिसीण, 1795-96 ठकी कोंढूरकरीण यांना लिंगाण्याच्या कारागृहात ठेवल्याच्या नोंदी कागदपत्रांत आढळतात. पोतनीसांकडून रायगड पेशव्यांकडे आला तेव्हा लिंगाण्यावर दोन तोफा व दोन जंबुरे असल्याची नोंद मिळते. पेशव्यांमार्फत हंसाजी खैरा यांना रायगडचे किल्लेदार करण्यात आले तर संभाजी दौंड, चिमणाजी गोविंद व खंडोजी शेळके यांना लिंगाण्याची व्यवस्था सुपूर्द करण्यात आली. धोंडो नारायण मोने हे कारकून म्हणून त्यांना मदत करीत असत. त्यावेळी 12 खंडी भात आणि 19 खंडी नागली (नाचणी) गडावर होती, अशी नोंद मिळते. पुढे देवजी गोपाळला लिंगाण्याची सबनिशी सांगितल्याचे आढळते. 1795 मध्ये बाळकृष्ण हवालदार म्हणून काम करु लागले. 1813-14 मध्ये लिंगाण्याचा वार्षिक खर्च हा 3150 रुपये होता. 1818 रायगडबरोबर कर्नल प्रॉथर याने लिंगाणाही ताब्यात घेतला.